मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ फेब्रुवारीला देशातील ५५० रेल्वे स्टेशनच्या अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकासाचं शुभारंभ करणार आहेत. देशातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी अमृत भारत योजनेअंतर्गत ४० हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय २ हजार रेल्वेस्थानकांमधील १५०० उड्डाणपूल, भूमिगत रस्त्येंचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ५५० स्थानकांमध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या २० स्थानकांचा समावेश आहे. अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेंतर्गत १३०९ रेल्वे स्थानकं निश्चित करण्यात आली आहेत. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या स्थानकांपैकी २० स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी ५५४ कोटी रुपायंचा खर्च करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या १२ आणि पश्चिम रेल्वेवरील ८ स्थानकांचा यामध्ये समावेश असेल. २६ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
अमृत भारत योजनेंतर्गत या स्थानकांमध्ये १२ मीटर रुंदीचे पादचारी पूल बांधण्यात येतील. आधुनिक स्वरुपात नव्या रचनेसह स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन, आधुनिक बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विजेचे दिवे बसवले जाणार आहेत. रेल्वे स्थानकांमध्ये लिफ्ट आणि सरकत्या जिने देखील बसवले जाणार आहेत. रेल्वेच्या वेळा दर्शवण्यासाठी आधुनिक डिजीटल बोर्ड, तिकीटघरांचा विकास करण्यात येईल. हा विकास करताना दिव्यांगांचा देखील विचार केला जणार आहे. दरम्यान, अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्टेशनमध्ये पुनर्विकासाची कामं सुरु आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाचं देखील काम सुरु आहे.
मध्य रेल्वेवरील कोणत्या स्थानकांचा विकास?
मध्य रेल्वेवरील भायखळा, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, वडाळा, दिवा, मुंब्रा, इगतपुरी, शहाड, टिटवाळा स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांच्या विकासासाठी २६४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील कोणत्या स्थानकांचा विकास होणार?
मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परेल, प्रभादेवी, जोगेश्वरी, मालाड, पालघर या रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी २८८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.