मुंबई : बोगस सोने देऊन एका खासगी बँकेला सुमारे ३९ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी बँकेच्या व्हॅल्युअर महिलेसह सहा जणांविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात सपना भट, शमी अनिल खत्री, जयनेंद्र जाधव, रफत शमी खत्री, यश जय पारेख आणि पारेख जलपाबेन यश याचा समावेश आहे. याआधी सपना हिला फसवणुकीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती.
यातील तक्रारदार बोरिवली परिसरात राहत असून ते मालाडच्या एका खासगी बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करतात. ऑगस्ट ते नोव्हेबर २०२१ या कालावधीत त्यांच्या बँकेत पाच जणांनी गोल्ड लोनसाठी अर्ज केला होता. त्यांना सोने तारण ठेवून ३९ लाखांचे कर्ज दिले होते. कर्जाची रक्कम त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. या वेळी सपना भट हिने बँक व्हॅल्युअर म्हणून काम पाहिले होते. मात्र, गोल्ड लोन दिल्यानंतर त्यांनी एकही हप्ता जमा केला नव्हता. त्यामुळे या सर्वांना बँकेतून नोटीस पाठविण्यात आली होती. नोटीसला त्यांनी कुठलेही उत्तर दिले नव्हते. त्यामुळे बँकेने त्यांच्या सोन्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. कर्जाच्या वसुलीसाठी दागिन्यांची फेरमूल्याकंन गरजेचे होते. त्यावेळी तपासणी केली असता सोने बनावट असल्याचे उघड झाले होते. सपना भट हिने ते दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन खातेदारांना कर्ज देण्यास सांगून बँकेची फसवणूक केली होती.