ठाणे : खंडणीविरोधी पथक, विशेष कृती दल, गुन्हे शाखा व युनिट पाचच्या यांच्या संयुक्त दोन ठिकाणच्या कारवाईत चार गावठी पिस्टल २२ काडतुसांसह एक मॅगझीन जप्त करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, याकरिता पोलिस प्रशासन सज्ज झाले असून पोलिस पथकांनी सराईत गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यातच खंडणी विरोधी पथक आणि विशेष कृती दलाला मिळालेल्या माहितीनुसार शंभू महतो नावाचा इसम गावठी कट्टे विक्रीकरिता साकेत रोड, राबोडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे खंडणीविरोधी पथकाने साकेत रोड, राबोडी येथे सापळा रचत शंभू सुरेश महतो (वय ३५) याला चार पिस्टल, दोन गावठी कट्टे, एक मॅगझीन व १८ जिवंत काडतुसे अटक केली. आरोपीला ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २५ एप्रिलपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर गुन्हे शाखेच्या दुसऱ्या कारवाई युनिट पाचच्या पथकाने वागळे इस्टेट रोड नं. १२ येथील नटवर हॉटेलसमोर गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत शेरबहादूर नवबहादुर कारकी, रा. चंडीगड यास विक्रीकरिता आणलेल्या दोन गावठी पिस्टल व चार काडतुसांसह अटक केली.