ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून केला जात असताना स्थानक स्वच्छ व सुंदर राखण्याचा प्रयत्न केला आहे. याची दखल मध्य रेल्वेने घेतली असून मध्य रेल्वेच्या पाच क्षेत्रीय ४६६ स्थानकांच्या पाहणीत ठाणे स्थानकाला सर्वांत स्वच्छ स्थानक म्हणून प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकांत ठाणे स्थानकाची गणना होते. दरदिवशी येथे सुमारे साडेसात लाख प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे स्थानक परिसरातील स्वच्छता ही तितकीच महत्त्वाची आहे. एकूण १० फलाट असणाऱ्या स्थानकात लोकल ट्रेनबरोबर बहुतांश मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या थांबतात. प्रवासादरम्यान प्रवाशांकडून फेकला जाणारा कचरा अस्ताव्यस्त पडणार नाही याची खबरदारी ठाणे रेल्वे व्यवस्थापक केशव तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेचे स्वच्छता कर्मचारी घेतात. ठाणे स्थानकात दिवसभराच्या तीन पाळीमध्ये स्वच्छता कर्मचारी काम करतात. दिवसाला सुमारे दोन टन कचरा साफ केला जातो.
मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या क्षेत्रीय स्थानकांत कार्मिक, इलेक्ट्रिक, मेडिकल, स्वच्छता, सुरक्षा, गार्डन इत्यादीचे सर्वेक्षण केले. यामध्ये ठाणे स्थानकाला स्वच्छतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. स्वच्छता ही एक निरंतर प्रक्रिया आहे. रेल्वे स्थानक व परिसर स्वच्छ ठेवणे ही रेल्वे प्रशासनासोबत प्रवाशांचीही जबाबदारी आहे. प्रत्येक प्रवाशाने स्वच्छता राखण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, ही विनंती. – प्रवीण पाटील,वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी