मुंबई : व्यावसायिकाच्या घरी प्राप्तिकर अधिकारी म्हणून दाखल होऊन १८ लाख रुपयांची लूट करणाऱ्या आठ जणांना शीव पोलिसांनी अटक केली. आरोपींविरोधात फसवणूक व तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ नोव्हेंबरला सकाळी ११ च्या सुमारास तक्रारदार श्रीलता पटवा यांच्या घरी चार व्यक्ती प्राप्तिकर अधिकारी म्हणून दाखल झाले. यावेळी त्यांनी आपण प्राप्तिकर अधिकारी असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवून घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर त्यांनी घरात उपस्थित सर्वांचे मोबाईल काढून घेऊन त्यांना एका बाजूला बसवून ठेवले. घरात जेवढी रोख रक्कम दागिने असतील, ते बाहेर काढून ठेवा, असे आरोपींनी सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे रोख रक्कम व दागिने बाहेर काढून त्यांच्या समोर ठेवले.
त्यानंतर पटवा कुटुंबियांनी सादर केलेले सर्व कागदपत्रे त्यांनी तपासले व तुम्हाला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर कायदेशीर बाबींची पुर्तता करण्यासाठी पटवा यांच्या मुलाला आरोपी सोबत घेऊन गेले. त्यानंतर आरोपी सर्व मालमत्ता घेऊन फसवून पळून गेले. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली. त्यात प्राप्तीकर अधिकारी, माहिती देणारे, पैसे स्वीकारणाऱ्यांचाही समावेश आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी कुठे लूट केली आहे का, याबाबत तपास सुरू असल्याचे उपायुक्त (परिमंडळ-४) प्रशांत कदम यांनी सांगितले. पटवा यांच्या मुलाच्या मित्रानेच आरोपींना याबाबतची माहिती दिली होती. त्यालाही याप्रकरणी अटक करण्यात आली. गुन्ह्यांत वापरण्यात आलेली मोटरगाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. संतोष पटले (वय ३७), राजराम मांगले (वय ४७), अमरदीप सोनावणे (वय २९), भाऊराव इंगळे(वय ५२), सुशांत लोहार(वय ३३), शरद एकावडे (३३), अभय कासले (३१) व रामकुमार गुजर (३८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.