कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी रेतीबंदर भागातील कल्याण डोंबिवली पालिकेच्या बेघरांसाठी घरे, खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या राखीव भूखंडावर भूमाफियांनी पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार करून युसुफ हाईट्स ही १० माळ्याची बेकायदा इमारत उभारली. ही बेकायदा इमारत अधिकृत, पालिकेच्या परवानगीने बांधली आहे असे १० घर खरेदीदारांनी खोटे सांगून त्यांची घर खरेदीच्या माध्यमातून एक कोटी ८२ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. सन २०१२ ते मार्च २०२४ या कालावधीत या बेकायदा इमारतीची उभारणी करून यामधील घर खरेदीदारांना भूमाफियांनी विक्री केल्या आहेत. सलमान अनिस डोलारे, फराज मैहमूद हारे आणि इतर अशी भूमाफियांची नावे आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेच्या दुर्गाडी रेतीबंदर भागातील बेघरांसाठी घरे या आरक्षण क्रमांक ९७ वरील ३७६ चौरस मीटरच्या राखीव भूखंडावर, ११५ चौरस मीटरच्या आरक्षण क्रमांक ९८ वरील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर युसूफ हाईट्स ही बेकायदा इमारत उभारण्यात आली आहे.
दहा माळ्याची ही बेकायदा इमारत उभारण्यासाठी भूमाफियांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या, बनावट स्वाक्षऱ्या, खोटे शिक्के वापरले. महसूल विभागाची बनावट अकृषिक परवानगी तयार करण्यात आली. बनावट भोगवटा प्रमाणपत्रे तयार करण्यात आले. ही सर्व कागदपत्रे खरी आहेत असे दाखवून भूमाफियांनी या बेकायदा इमारतीची मागील १४ वर्षाच्या कालावधीत उभारणी केली. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दुर्गाडी रेतीबंदर भागात युसुफ हाईट्स इमारत आहे. या इमारत घर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना आरोपींनी ही इमारत अधिकृत आहे. पालिकेच्या परवानग्या या इमारतीला आहेत असे सांगितले. या बोलण्यावर विश्वास ठेऊन १० घर खरेदीदारांनी युसुफ हाईट्स इमारतीत कर्ज काढून घरे खरेदी केली. युसुफ हाईट्स इमारत बेकायदा आहे हे समजल्यावर एका रहिवाशाच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात भूमाफियांविरुध्द घर खरेदीदार, शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक के. एस. सय्यद याप्रकरणाचा तपास करत आहेत.