पुणे : कल्याणीनगर अपघातानंतर चर्चेत आलेल्या पुण्यातील बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी एम. पी. परदेशी यांची बदली करण्यात आली. परदेशी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘रजिस्ट्रार जनरल’ यांनी न्यायाधीशांच्या बदल्यांचा आदेश दिला. पुण्यातील बाल न्याय मंडळाचे कामकाज प्रमुख न्यायदंडाधिकारी परदेशी आणि डॉ. एल. एन. धनावडे आणि के. टी. थोरात पाहतात. धनावडे आणि के. टी. थोरात शासन नियुक्त सदस्य आहेत.
परदेशी यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांची बदली करण्यात आली. त्यांची बदली नियमित स्वरूपाची आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. कल्याणीनगर भागात १९ मे रोजी अपघात झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले हाते. मुलाला बाल न्याय मंडळात हजर केल्यानंतर त्याला वाहतूक प्रश्नावर ३०० शब्दांचा निबंध आणि १५ दिवस वाहतूक पोलिसांबरोबर काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर त्याची मुक्तता करण्यात आली होती. या निर्णयावर नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती.