मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. आता हा निकाल समोर यायला अवघे काही तास बाकी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ४ जून रोजी उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणाची तारीख बदलली आहे. निवडणुकीचा निकाल पाहता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता हा निर्णय घेतला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं असताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ४ जून रोजी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. पण मनोज जरांगे पाटील यांच्या गावामधून म्हणजे अंतरवाली सराटी येथील काही ग्रामस्थांनी उपोषण आंदोलनाला विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण तात्पुरत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी ४ जून रोजीचं उपोषण तात्पुरत स्थगित करत आता उपोषणाची नवी तारीख घोषीत केली आहे. येत्या ८ जून रोजी आपण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने आचारसंहितेचा भंग होऊ नये, किंवा आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी सावध भूमिका घेत उद्याचं उपोषण तात्पुरत स्थगित केलं असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यामुळे उद्याचं उपोषण स्थगित करत आता गाव सोडून दुसरीकडे उपोषण करणार आहे, माझ्यासाठी गावकरी अडचणीत येणार नाहीत, यासाठी हा निर्णय़ घेत असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.