वृत्तसंस्था : सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस २०’ सध्या प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत असून, आता शोच्या ग्रँड फिनालेच्या तारखेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, २० डिसेंबर २०२६ रोजी या पर्वाचा ग्रँड फिनाले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या तारखेबाबत अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर या चर्चेला वेग मिळण्यामागे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचे अलीकडील वक्तव्य कारणीभूत ठरले आहे. सलमान खानच्या अनुपस्थितीत ‘वीकेंड का वार’चे सूत्रसंचालन करताना रोहित शेट्टी यांनी स्पर्धकांना, “तुम्ही आता या प्रवासाचा अर्धा टप्पा पूर्ण केला असून विजेता ठरण्यासाठी केवळ ८ आठवडे शिल्लक आहेत,” असे सांगितले. या वक्तव्यानंतरच २० डिसेंबर ही संभाव्य अंतिम तारीख असल्याचा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला आहे.
६ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू झालेल्या या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी टीआरपीच्या आधारे ‘बिग बॉस’चा कालावधी काही आठवडे वाढवला जातो. मात्र, यंदाचा सीझन नियोजित वेळेतच संपवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातच विजेत्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरातील वाढता संघर्ष, नवनवीन टास्क आणि स्पर्धकांमधील रंगतदार वाद यामुळे प्रत्येक भाग चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वाची ट्रॉफी कोण उंचावणार, याकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे. अधिकृत फिनालेची तारीख जाहीर होणे अद्याप बाकी असले तरी, रोहित शेट्टी यांच्या वक्तव्यानंतर ‘बिग बॉस २०’च्या अंतिम सोहळ्याविषयी उत्सुकता आणखी वाढली आहे.

