मुंबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. यावेळी भाजपाचे नारायण राणे आणि नितेश राणे हेदेखील राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणे यांचे समर्थक आमने-सामने आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. जवळपास दोन अडीच तास चाललेल्या या राड्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मालवण येथील घटनेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. मालवण येथे भाजपाच्या गुडांनी पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न केला. ही परिस्थिती हातळण्यात देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले, त्यांना लाज वाटली पाहिजे, असे ते म्हटलं.
“मालवणमध्ये जे काही घडलं, हा महाराष्ट्राच्या गृह खात्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे, ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत, पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत पोलिसांना संरक्षणही देऊ शकले नाहीत, खुलेआम पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला, फक्त पोलिसांना हल्ला करायचा बाकी होता, हे सगळं सुरू असताना गृहमंत्री काय करत होते? तर या सगळ्याचं समर्थन करत आहे”, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार फडणवीस यांच्या काळात उध्वस्त झाला आहे. राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्तीच्या नावाखाली भाजपाच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार केला आहे तेवढा कोणीही केलेला नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. याच पैशांचा वापर निवडणुकीत राजकारणात झाला आहे. आय.एन.एस. विक्रांत वाचवण्याच्या व्यवहारात सुद्धा भाजपाने पैसे खाल्ले, विशेष म्हणजे गृहमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिली फाईलवर जी सही केली, ती हे प्रकरण बंद करण्यासंदर्भात होती”, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात भाजपाने केलेलं कृत्य हे अधम आणि नीच प्रकारचं आहे. शिवाजी महाराज असते, तर अशा लोकांचा कडेलोट केला असता. त्यामुळे आम्ही जोडे मारा आंदोलन करणार आहोत. या आंदोलनात महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेतेही उपस्थित राहतील”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.