मुंबई : मुंबई मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु असताना जलवाहिनी फुटली असल्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील पाच वॉर्डांमधील नागरिकांना पाणीबाणीला सामोरं जावे लागत आहे. दरम्यान, फुटलेली जलवाहिनी दुरुस्त झाली असून पाणीपुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाहीय. लाखो नागरिकांची गैरसोय होऊन सध्या टॅंकरमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही जलवाहिनी ३० नोव्हेंबरला फुटली होती. प्रशासनाने २ डिसेंबरपर्यंत संपूर्ण जलवाहिनी दुरुस्त करुन पाणीपुरवठा सुरळीत करु, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर पुन्हा एक आश्वासान देण्यात आलं की कालपर्यंत म्हणजेच तीन तारखेपर्यंत संपूर्ण परिस्थिती सुरळीत करु. मात्र, ”अनेक प्रयत्न केल्यानंतरही काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्याकडून पाणीपुरवठा सुरळीत करता येत नाहीय”, असं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.
तब्बल ११८ जागांवर आम्ही पाणीटँकर पोहोचवतोय असंही प्रशासनाने सांगितलं आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यात नेमकी काय तांत्रिक अडचण येत आहे हे देखील प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. जी जलवाहिनी फुटली आहे ती जमिनीत सहा फूट खोलवर आहे. काही बांधकाम मध्यंतरीच्या काळात झाले. त्यामुळे त्या बांधकामांच्या भरावाची माती वारंवार या पाईपलाईनच्या भागात कोसळली. त्यामुळे या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी वारंवार ती माती उपसावी लागते, त्याशिवाय ही पाईपलाईनला एकाच ठिकाणी गळती लागली नसून अनेक ठिकाणी या पाईपलाईनला गळती लागली आहे, असं प्रशासनाने सांगितलं आहे. दरम्यान, गळती लागलेले ठिकाण शोधून ते दुरुस्त करावं लागत आहे, त्यामुळे बराच कालावधी जातोय. अनेक ठिकाणी आमचे कर्मचारी तळ ठोकून बसलेत, असं देखील प्रशासनाने सांगितलं आहे. त्यामुळे लवकरात आम्ही पाणीपुरवठा सुरळीत करु, विशेषत: अंधेरी आणि विले पार्ले येथे बऱ्याच ठिकाणी पाणीपुरवठा खंडीत झालेला आहे. त्यामुळे तिथे टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. घाटकोपर, अंधेरी जोगेश्वरी भागात मागील ४८ तासांपासून पाणीपुरवठा बंद आहे. घाटकोपरमध्ये तर रिक्षातून पाण्याची वाहतूक करण्यात येत आहे.