मुंबई : राज्यात तीव्र पाणी टंचाई असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करावे. कोणत्याही भागात पाण्याची टंचाई जाणवणार नाही असे नियोजन करावे, प्रभावी उपाययोजनांद्वारे पाणीटंचाईवर मात करावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात राज्यातील टंचाईसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस आमदार संजय रायमूलकर, आमदार भास्कर जाधव, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशनचे अभियान संचालक अमित सैनी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उन्हाळा सुरू होत असून त्यादृष्टीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले की, टंचाई निवारणासाठी सूक्ष्म आराखडा तयार करावा. राज्यात सुरु असलेल्या टँकरचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा. पाणी पुरवठ्याच्या सुरू असलेल्या योजना कोणत्या टप्प्यात आहेत, सध्या कोणत्या जिल्ह्यात किती टँकर सुरू आहेत या बाबींचा आराखड्यात समावेश असावा. टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकारी यांना देण्यात यावेत. स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांनी टँकरबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी राज्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजना तसेच ‘हर घर जल’ योजनेच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. ‘हर घर जल’ योजनेच्या कामांना गती द्यावी, या योजनांच्या अंमलबजावणीत काही अडचणी असल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी. तपासणी पथकाद्वारे कामांची पाहणी करून अहवाल सादर करावेत. वेळेत काम न करणाऱ्या, कामाचा दर्जा खराब असलेल्या ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.