ठाणे : उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या परवाना असलेल्या बंदूकीने शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर ठाणे आयुक्तालय क्षेत्रात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्यांचा प्रश्न देखील समोर आला आहे. आयुक्तालय क्षेत्रात आतापर्यंत एकूण ४ हजार ३५० जणांना स्व-संरक्षणासाठी बंदूक परवाने दिले असून सर्वाधिक परवाने ठाणे शहरात देण्यात आले आहे. त्यांची संख्या १ हजार ९०० इतकी आहे. तर डोंबिवली आणि कल्याण शहरात १ हजार ३०० जणांना बंदूक परवाने देण्यात आले आहेत. यातील काहीजण खोट्या प्रतिष्ठेसाठी बंदूका वापरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या परवान्यांच्या पडताळणीचे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कल्याण येथील जमीनीच्या वादातून आमदार गणपत गायकवाड यांच्या स्वत:कडील बंदुकीने शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. महेश गायकवाड हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. हिललाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयामध्ययेच हा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ठाणे आयुक्तालया क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी येथील शहरी भाग येतो. या क्षेत्रामध्ये एकूण ४ हजार ३५० बंदूक परवान्यांचे आतापर्यंत वाटप करण्यात आले आहे. यातील बहुतांश परवाने राजकीय पक्षाशी निगडीत असलेले पदाधिकारी, बांधकाम व्यवसायिक यांच्याकडे आहेत. तर काही परवाने निव्वळ खोट्या प्रतिष्ठेसाठी घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे बंदूक परवान्यांविषयी आता ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी परवाने पडताळणीचे आदेश दिले आहेत. या पडताळणीमुळे आता काही परवाने निलंबित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बंदूक परवाना मिळविण्यासाठी सुरुवातीला पोलिसांच्या परवाना विभागाकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर हा अर्ज संबंधित व्यक्ती वास्तव्यास असलेल्या भागातील पोलीस ठाण्यात पाठिवला जातो. तिथे त्या व्यक्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याच्या जिवाला कोणापासून धोका आहे का ? याची माहिती घेतली जाते. त्यानंतर हा अर्ज संबंधित क्षेत्राच्या उपायुक्त कार्यालयात पाठविला जातो. तेथून परवान्यासाठी शिक्कामोर्तब मिळाल्यानंतर तो अर्ज पुन्हा परवाना विभागात पाठविला जातो. त्यानंतर व्यक्तीला परवाना मिळविण्याचा मार्ग मोकळा होतो. परवाना सुमारे पाच वर्षांसाठी असतो. त्याच्या नुतनीकरणासाठी पाच वर्षांतून केवळ २ हजार १०० रुपये इतका खर्च असतो. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्राची स्थापन झाल्यापासून परवाना विभागात पोलीस निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली नव्हती. त्यामुळे विभागातील सुसुत्रतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आयुक्तपदी रूजू होताच, दुसऱ्याच दिवशी येथे एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.