मुंबई : गोपाळकाल्याचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबई, ठाणे आणि परिसरातील गोविंदा पथकांनी अंतिम तयारीला वेग दिला आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवात सर्वाधिक चर्चा नऊ आणि दहा थरांच्या मानवी मनोऱ्यांची होत आहे. गेल्या काही वर्षांत गोविंदा पथकांनी सरावाचे स्वरूप अधिक व्यावसायिक केले असून यंदा तब्बल २० ते २५ पथकांनी सरावादरम्यान नऊ थर यशस्वीरीत्या रचल्याची माहिती समोर आली आहे. काही पथके दहा थरांचा सराव पूर्ण करून प्रत्यक्ष उत्सवात अकरा थरांचा विक्रम करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे यंदाची दहीहंडी विक्रम, प्रतिष्ठा आणि मोठ्या पारितोषिकांच्या शर्यतीची ठरणार आहे. मात्र या वाढत्या स्पर्धेचा फटका मध्यम आणि लहान गोविंदा पथकांना बसण्याची चिन्हे आहेत. पूर्वी पाच ते सात थर रचणाऱ्या पथकांना आकर्षक पारितोषिके मिळत होती, पण आता आयोजकांचे लक्ष नऊ आणि दहा थरांवर केंद्रित झाल्याने सहा, सात आणि आठ थर रचणाऱ्या पथकांसाठी जाहीर होणारी रक्कम मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. अनेक पथकांनी दोन महिन्यांपासून रात्री उशिरापर्यंत कठोर सराव, सुरक्षा साहित्य, प्रवास, वैद्यकीय व्यवस्था आणि खेळाडूंच्या देखभालीवर मोठा खर्च केला आहे. मात्र पारितोषिकाची रक्कम खर्चाच्या तुलनेत अत्यल्प असल्याने हा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न अनेक लहान पथकांसमोर उभा राहिला आहे. दहीहंडीतील वाढत्या स्पर्धेमुळे विक्रम करण्याची प्रेरणा मिळत असली तरी आर्थिक विषमता वाढत असल्याची भावना अनेक गोविंदांमध्ये व्यक्त होत आहे.
ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडीमध्ये विश्वविक्रम करणाऱ्या पथकासाठी २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दहा थर रचणाऱ्या पथकाला ११ लाख रुपये, तर ठाण्यातील नऊ थर रचणाऱ्या पथकाला ५ लाख रुपये आणि ठाण्याबाहेरील पथकाला दोन लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. आठ थरांसाठी २५ हजार, सात थरांसाठी १५ हजार, सहा थरांसाठी १० हजार आणि पाच थरांसाठी केवळ पाच हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. यामुळे ठाणे आणि बाहेरील पथकांमध्ये भेदभाव होत असल्याची नाराजी काही पथकांनी व्यक्त केली आहे. घाटकोपरमधील अमृतनगर येथेही नऊ, आठ आणि सात थरांसाठी लाखो रुपयांची पारितोषिके जाहीर झाली असली, तरी त्यानंतर त्याच उंचीचे थर रचणाऱ्या पथकांना तुलनेने कमी रक्कम दिली जाणार आहे. ठाण्यातील कॅसल मिल नाका येथेही दहा आणि नऊ थरांसाठी मोठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्येक आयोजकाकडे सर्वप्रथम पोहोचून सर्वाधिक उंच थर रचण्यासाठी पथकांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, पारितोषिकांच्या या शर्यतीमुळे गोविंदांचा उत्साह वाढत असला तरी अधिक उंच थर रचण्याच्या प्रयत्नात सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनू शकतो. त्यामुळे आयोजक, गोविंदा पथके आणि प्रशासन यांनी सुरक्षिततेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून उत्सव साजरा करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

