ठाणे : शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी यापुढे जीपीएस सॅटेलाईट प्रणालीचा अवलंब करावा. अनधिकृत बांधकाम शहरात होत असल्याचे निदर्शनास येताच ते तत्काळ निष्कसित करण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. वनविभाग, खार जमिनीच्या जागेवर नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामांबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करुनही कारवाई न झाल्यास त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचनाही आयुक्त सौरव राव यांनी यावेळी दिल्या. शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेला नाही. विशेष करून खाडीच्या पलिकडे कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली असून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कळव्यातील अनाधिकृत बांधकामे, नालेसफाई तसेच पाणीपट्टी वसुलीचीचा आढावा घेतला.
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कळवा परिसरात झालेली व होत असलेली विकास कामे तसेच संपूर्ण शहराची भौगोलिक परिस्थिती, कळवा पूर्व परिसरातील पारसिक डोंगर व तीन बाजूंनी वेढलेला खाडी किनारा या दृष्टीने शहराचे क्षेत्रफळ आदी सर्व माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त सौरभ राव यांनी जाणून घेतली. सद्यस्थितीत कळवा प्रभाग समितीच्या माध्यमातून मालमत्ता करवसुली ७५ टक्के व पाणीपट्टी ६२ टक्के असल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त करीत पाणीपट्टी व मालमत्ता करवसुली १०० टक्के झालीच पाहिजे या दृष्टीने कृती आराखडा करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी यावेळी दिले. प्रभाग समितीत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेवून ज्या तक्रारींचा निपटारा प्रभाग समिती स्तरावर करणे शक्य आहे तो जलदगतीने करावा. तसेच तक्रारीचा निपटारा झाल्यावर संबंधित तक्रारदाराला त्याची माहिती देण्यात यावी. तसेच ज्या तक्रारी मुख्यालयामार्फत सोडविणे आवश्यक आहे, त्या संबंधित विभागाकडे वर्ग कराव्यात. शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण यांचा मासिक अहवाल तयार करुन तो सादर करण्याचे निर्देशही सहाय्यक आयुक्तांना सदर बैठकीत देण्यात आले.