रत्नागिरी : ‘ज्या गद्दारांनी आपले सरकार पडले, त्यांच्या नाकावर टिच्चून मी पुन्हा एकदा शिवसेनेचे सरकार स्थापन करून येत्या लोकसभा निवडणुकीत लाल किल्ल्यावर फडकवून दाखवतो,’ असे खुले आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. ‘तुम्ही वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांना निवडून दिले नसते, तर इकडे सगळी गुंडागर्दी आणि गँगवार झाले असते,’ अशी टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी पहिल्या दिवशी सावंतवाडी, कुडाळ, मालवण, कणकवली या चार सभा झाल्या. या सगळ्या सभांमधून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, दीपक केसरकर यांच्यावर शरसंधान केले. ‘सत्ताधारी पक्षांत गँगवॉर सुरू झाले आहे. सगळ्यात जास्त निवडणूक रोखे सहा की आठ हजार कोटी रुपये, हे भारतीय जनता पक्षाकडे आहेत. ‘कोणाला पैसे दिलेत, तर याद राखा. तुमच्या सगळ्या भानगडी बाहेर काढू,’ अशा धमक्या उद्योगपतींना दिल्या जात आहेत आणि त्यांच्याकडून खंडण्या वसूल केल्या जात आहेत,’ असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
‘फयान, तौक्ते, महापूर अशी मोठी संकटे कोकणावर आली. त्या वेळी हे कुठेच आले नव्हते; पण अचानक त्यांना आठवण झाली की छत्रपती शिवाजी महाराज नावाची व्यक्ती आपल्या देशात मोठी होऊन गेली आणि त्यांनी आरमाराची स्थापना केली. हा सिंधुदुर्ग मतदारसंघ जिंकण्यासाठीची ही ढोंगे आहेत,’ अशा शब्दांत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले.