मुंबई : मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात राबविलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत मोठी कारवाई करत १ जून ते ९ जुलै २०२६ या कालावधीत २ लाख १० हजार प्रवाशांकडून तब्बल १६.१६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, १ जून ते १९ जून या कालावधीत तिकीट तपासणी पथकाने विनातिकीट व अनियमित प्रवासाची १.१४ लाख प्रकरणे उघडकीस आणली. त्यावेळी प्रति प्रवासी २५० रुपये दंड आकारण्यात येत असून, या कालावधीत ६.१५ कोटी रुपये वसूल करण्यात आले. त्यानंतर १९ जूनपासून विनातिकीट प्रवासावरील किमान दंडाची रक्कम ५०० रुपये करण्यात आली. दंड वाढवल्यानंतर २० जून ते ९ जुलै या कालावधीत रेल्वेने ६.९८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. या मोहिमेद्वारे विनातिकीट प्रवासावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याबरोबरच रेल्वेचा महसूल सुरक्षित करण्यावर भर देण्यात आला आहे.
मध्य रेल्वेकडून मुंबई विभागात मेल-एक्सप्रेस तसेच उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये नियमितपणे विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या कारवाईमुळे केवळ विनातिकीट किंवा अनियमित तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई होत नाही, तर इतर प्रवाशांनाही नियमांचे पालन करण्याचा संदेश मिळतो. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, प्रवाशांकडून मिळणारा तिकीट महसूल हा प्रवासी सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरला जातो. त्यामुळे विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेच्या उत्पन्नावर थेट परिणाम होतो. प्रवासादरम्यान दंड आणि अन्य गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक प्रवाशाने वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, तसेच जबाबदारीने आणि नियमांचे पालन करून रेल्वे सेवांचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. विनातिकीट प्रवासाबाबत ‘शून्य सहनशीलता’ धोरण कायम असल्याचेही रेल्वे प्रशासनाने पुन्हा स्पष्ट केले आहे.

