मुंबई : नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) १४ ते १६ जुलैदरम्यान मुंबईत व्यापक धडक कारवाई केली. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डेअरी, दूध विक्रेते आणि किरकोळ व्यावसायिकांवर छापे टाकत अनेक गंभीर अनियमितता उघडकीस आणल्या. या कारवाईत मरीन लाईन्स येथील पारशी डेअरी फार्म प्रा. लि. येथे तपासणीदरम्यान उत्पादन विभागात अस्वच्छता, भिंतींवर बुरशी, माशांचा वावर, कीटकप्रतिबंधक जाळ्यांचा अभाव तसेच अनेक उत्पादनांवर ‘बेस्ट बिफोर’ची माहिती नसल्याचे आढळून आले. ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकणाऱ्या या त्रुटी लक्षात घेऊन एफडीएने डेअरीचा एफएसएसएआय परवाना तात्काळ निलंबित केला. याच मोहिमेदरम्यान मालाड परिसरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा मोठा साठाही जप्त करण्यात आला. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा एफडीएने दिला आहे.
बुधवारी पहाटे एफडीए आणि मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-११ यांनी गोरेगाव (पश्चिम) येथे संयुक्त कारवाई करून दुधाच्या पिशव्या उघडून त्यामध्ये फेरफार करून विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांना अटक केली. या कारवाईत ८२२ दुधाच्या पिशव्यांमधील ५५८ लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. संबंधितांविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, गोवंडी येथील मेसर्स सूफी डेअरी येथे तपासणीदरम्यान पाश्चराईज्ड म्हशीचे दूध नियमानुसार सीलबंद पॅकेजिंगऐवजी उघड्या भांड्यांतून विकले जात असल्याचे निदर्शनास आले. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे एफडीएने १,६८३ लिटर दूध जागेवरच नष्ट केले आणि संबंधित डेअरीला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली. या सलग कारवायांमधून ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कठोर भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार एफडीएने पुन्हा अधोरेखित केला आहे.

