ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या वेळी राजकीय पक्ष्यांमध्ये बॅनर फाडण्यावरून तसेच अनेक कारणांवरून वाद होत असतात.अशाप्रसंगी पोलिसांची तत्परता आणि रिस्पॉन्स टाइम तपासण्यासाठी उल्हासनगरातील पोलीस हे अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी राईड-स्कीमच्या प्रत्यक्षिकांचा थरार सादर करून आम्ही सज्ज असल्याचा मॅसेज दिला. कल्याण लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही २० रोजी होणार असून आज महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.येत्या काही दिवसात विविध राजकीय पक्षाचे उमेदवार त्यांचे उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.
निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरवात झाल्यावर बॅनर्स-पोस्टर्स-कट आऊट्स झळकणार आहेत.अशावेळी बॅनर फाडण्यावरून तसेच अनेक कारणांवरून वाद आणि दंगे होत असतात. त्यामुळे पोलिसांची तत्परता आणि रिस्पॉन्स टाइम तपासण्यासाठी पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे,सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी राईड स्कीम प्रत्यक्षिकांच्या थराराचे आयोजन १७ सेक्शन वरील महामार्गावर केले होते. या राइड स्कीम मध्ये एस.आर.पी.एफ ची तुकडी, झोन फोर स्ट्राइकिंग, मध्यवर्ती पोलीस आणि विठ्ठलवाडी पोलीस सहभागी झाले होते.यावेळी दंगल नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतात याबाबत ट्रेनिंग देण्यात आले.