मुंबई : शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू सामान्य नागरिकांसाठी सुरू केल्यानंतर रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून सेल्फी काढणाऱ्यांची संख्याच अधिक दिसून आली. यावेळी अटल सेतूवर वाहन उभे करून इतर प्रवशांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी २६४ वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या चालकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या १० किलोमीटर ४०० मीटर एवढ्या हद्दीच्या वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलीस पाहत आहेत. उर्वरीत १० किलोमीटर ४०० मीटर भागाची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांकडे आहे. मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणारे बहुतांश प्रवासी केवळ सेतू पाहण्यासाठीच तेथून प्रवास करत होते. यावेळी सहकुटुंब आलेले अनेक नागरिक सुरक्षेची, स्वच्छतेची काळजी घेताना दिसत नव्हते. अनेक नागरिक रस्त्याच्या एका बाजूला गाड्या थांबवून सेल्फीचा छंद पूर्ण करताना दिसत होते. पोलिसांनीही अटल सेतूवरील चालकांना गाडी न थांबवण्याची विनंती केली. त्यानंतरही अनेक नागरिक वाहन रस्त्याच्या शेजारी थांबवत होते. त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी सागरी सेतूवर १२० वाहन चालकांवर कारवाई केली. नवी मुंबई पोलिसांनी १४४ वाहन चालकांवर कारवाई केली. मोटर वाहन कायदा कलम १२२ व १७७ कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वाहन चालकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. भविष्यात अशा चालकांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पोलीस विचार करत आहेत.
या सागरी पुलावर वेग मर्यादा १०० किलोमीटर प्रति तास आहे. तसेच चढण व उतरणीच्या भागात ती ४० किमी. प्रति तास आहे. त्यावर तीन चाकी व दुचाकी वाहनांना प्रवास करायला परवानगी नाही. त्यासाठी सेतूवर सीसीटीव्ही बसवण्यात आले असून त्यामुळे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून अटल सेतूवरील वाहतुकीची पाहणी करणे शक्य होणार आहे. आझाद मैदान, पायधुनी व वडाळा येथील सागरी सेतूवर जाणाऱ्या मार्गिकांवर अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पण या सेतूला रफी किडवाई मार्गावर बाहेर पडण्यासाठी व्यवस्था सध्या नसल्यामुळे सुरवातीचे काही दिवस सेतूला जोडणाऱ्या मार्गिकांवर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.