मुंबई : उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंमधलं वैर जगजाहीर आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडून साधारण दोन दशकं होऊन गेली तरी दोन्ही चुलत भावांमधून विस्तवही जात नाही. मोजक्या कौटुंबिक कार्यक्रमांचा अपवाद वगळता दोघांनी एकमेकांसोबत येणंही टाळलंय. ठाकरे बंधूंमधल्या वादाचा आता पुढचा अध्याय सुरु झालाय. काही दिवसांपूर्वी दिशा सालियन आरोपांवरुन आदित्य ठाकरेंची बाजू घेणाऱ्या शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्याचा संदर्भ शर्मिला ठाकरेंच्या टीकेला आहे.
ज्या माणसामुळे शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना बाहेर पडावं लागलं. त्याच माणसाच्या हातातून पक्ष सुटलाय असा टोला शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. विक्रोळीत मनसेच्यावतीने महोत्सावाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात बोलताना शर्मिला ठाकरे यांनी ‘या महिन्याच्या 10 तारखेला एक वर्तुळ पूर्ण झालं. शिवसेनेतील दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं, त्याच माणसाच्या हातून पक्ष सुटला’ असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. शिवसेना आमदार अपात्रता निकालांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. त्यात शर्मिला ठाकरेंनी एक वर्तुळ पूर्ण झालं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना शिंदे गटाला शिवसेनेची मान्यता दिली. राहुल नार्वेकरांच्या या निकालावरूनच शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेव्हापासून ठाकरे कुटुंबीयातील राजकीय वाद सार्वजनिक व्यासपीठावरूनही दिसून आले आहेत. आता या राजकीय वादांमध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर टीका केली आहे.
दिशा सॅलियन प्रकरणात शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली होती, मात्र शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत भावनिक असणाऱ्या विषयावर शर्मिलांनी टोला लगावला. त्यामुळे यानिमित्तानं राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे वाद पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.