मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. सध्याच्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली करण्यात आली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचे दिसत आहे.
रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे राज्याच्या मुख्य सचिवांना निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांचा पदभार देण्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच शुक्लनंतरच्या तीन अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. उद्या दुपारी १ वाजेपर्यंत ही नावे देण्यास सांगण्यात आले आहे.
रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसंच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत, असाही आरोप नाना पटोलेंनी केला होता.
दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी निवडणूक आयोगाकडे रश्मी शुक्ला यांना 20 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीआधी हटवण्याची मागणी केली होती. तसेच अशातच पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका या राज्यात करायच्या असतील तर तुम्हाला रश्मी शुक्ला यांना हटवावं लागेल, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.