ठाणे : डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ११ मजल्यावरून पडल्यामुळे तरूणाचा मृत्यू झाला. आत्महत्या की घातपात? की अन्य काही? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आधी तरूण इमारतीच्या जिन्याच्या बाहेरील बाजूला पकडून उभा होता. नंतर त्यानं उडी मारली. तरूण थेट खाली कोसळला. समोरच्या इमारतीतून एकानं याचा व्हिडिओ शूट केला. तसेच शेअर केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ऋषिकेश परब (वय वर्ष २२) असं मृत तरूणाचे नाव आहे. तो डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. काही वादामुळे परब त्रस्त होता. आत्महत्या करण्यापूर्वी तो बराचवेळ जिन्यावर बसून होता. नंतर इमारतीच्या भिंतीला पकडून लोंबकळत होता. यावेळी फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरूणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानं हात सोडून उडी घेतली. ११व्या मजल्यावरून उडी घेतल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. एकानं तरूणाचा व्हिडिओ शूट केला. तसेच समाज माध्यमांमध्ये शेअर केला. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तरूणानं आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

