मुंबई : ‘व्हॅलेंटाईन डे’, महाशिवरात्र आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सीएसएमटी – सावंतवाडीदरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. या विशेष रेल्वेगाडीने प्रवाशांना मुंबईतून थेट सावंतवाडी गाठणे शक्य होईल. ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त प्रियकर-प्रेयसी, मित्र परिवार आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी संधी मिळते. हा दिवस साजरा करण्यासाठी आणि महाशिवरात्रदरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या समन्वयाने गाडी क्रमांक ०११२९ / ०११३० सीएसएमटी – सावंतवाडी रोड – सीएसएमटी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०११२९ सीएसएमटी – सावंतवाडी रोड विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून १४, १९ आणि २१ फेब्रुवारी रोजी रात्री १२.२० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३० सावंतवाडी रोड – सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी १४, १९ आणि २१ फेब्रुवारी सायंकाळी ५.२० वाजता रोजी सावंतवाडी रोडवरून सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ही रेल्वेगाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल. या रेल्वेगाडीला एकूण २२ डबे असतील. यात द्वितीय वातानुकूलित श्रेणीचा एक डबा, तृतीय वातानुकूलित श्रेणीचे ५ डबे, शयनयान १० डबे, सामान्य ४ डबे एसएलआरचे २ डबे असतील. या रेल्वेगाडीचे आरक्षण प्रवासी आरक्षण प्रणाली, आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. कोकणातील अनेक प्राचीन शिव मंदिरांत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळते. कोकण रेल्वे मार्गाचा विचार केल्यास हरिहरेश्वर (श्रीवर्धन), विरेश्वर (महाड), देवाचा डोंगर (खेड), वेळणेश्वर (गुहागर), मार्लेश्वर (देवरुख – संगमेश्वर), कर्णेश्वर (संगमेश्वर), कुणकेश्वर (देवगड) या आणि अशा अनेक प्राचीन शिव मंदिरात शिवभक्तांची गर्दी होते. त्यामुळे मुंबईत स्थायिक झालेले अनेक नागरिक यानिमित्त आपल्या मूळ गावी जातात. नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी प्रचंड मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांना नियमित रेल्वेगाडीतून प्रवास करणे अवघड होते. भाविकांना कोकणातील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळांना भेटी देता येत नाही. सीएसएमटी – सावंतवाडी रोड विशेष रेल्वेगाडीमुळे भाविकांना दिलासा मिळेल.

