पुणे : पुणे कार अपघातप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. अल्पवयीन आरोपीचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हरला आमिष दाखवल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोर्श कारने जेव्हा दोघांना कारखाली चिरडलं तेव्हा अल्पवयीन आरोपी कार चालवत होता. जमावाने त्याला चोपल्याचंही दृश्यांमध्ये दिसत आहे. मात्र आरोपींकडून कार चालक बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांकडून कार चालक गंगाधर पुजारी याला मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. पोलीस आयुक्तांनीही याची गंभीर दखल घेतलीय. कारण पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी कलम १२० चाही समावेश केला. या प्रकरणात नव नविन खुलासे होत आहेत. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न पुणे अपघात प्रकरणात करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आले. पुरावे नष्ट करणा-याचा प्रयत्न करणा-यांवर कलम २०१ लावण्यात येणार आहे. मुलाला वाचवण्यासाठी ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न केला गेला असा दावाही पुणे पोलिसांनी केला आहे.
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी पोलीस संबंधित ड्रायव्हरचे कॉल रेकॉर्ड्स तपासणार आहेत. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा हे रेकॉर्ड्स तपासणार आहे. पोलिसांनी ड्रायव्हर पुजारीचे सीडीआर म्हणजे कॉल रेकॉर्ड्स काढले आहेत. १९ तारखेला अपघात झाला त्यावेळी हा ड्रायव्हर त्या कारमध्ये होता का हे सुद्धा पोलीस तपासत आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ड्रायव्हरची कसून चौकशी केली. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन पुणे पोलिसांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली. आरोपी विरोधात भक्कम केस उभी करण्याचा प्रयत्न असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. विशाल अग्रवालच्या मुलावर आयपीसी कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणातील आरोपींना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. आतापर्यंत मुलाचे वडील विशाल अग्रवाल, हॉटेलचा मालक प्रल्हाद भुतडा, हॉटेल व्यवस्थापक सचिन काटकर, ब्लॅक बारचा मालक संदीप सांगळे, हॉटेल कर्मचारी नितेश शेवाणी आणि जयेश गावकर हे ६ आरोपी अटकेत आहेत. आरोपींना पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांना पुन्हा चौकशीसाठी नेण्यात येणार आहेत. याशिवाय मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल आणि ड्रायव्हरचीही आज पुन्हा चौकशी होणार आहे.