पुणे : राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाने मागील तीन दिवसांत धडक मोहीम राबविली. त्यात विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३२ परवाने सील (बंद) केले. यामध्ये दहा रूफटॉप हॉटेल, १६ पब आणि सहा बारचा समावेश आहे. कल्याणीनगरमधील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकरणाची देशभर चर्चा झाल्यानंतर जागे झालेल्या विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी १४ पथके स्थापन केली आहेत. त्यांनी तीन दिवस राबविलेल्या मोहिमेत अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणे, वेळेचे बंधन न पाळणे, अनधिकृत ठिकाणी (रूफटॉप) मद्य वितरित करणे, अवैध मद्यसाठा ठेवणे आदी बाबी आढळून आल्या. त्यानंतर या सर्वावर कारवाईचा अहवाल विभागाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे सादर केला होता. त्यास दिवसे यांनी मान्यता दिल्यानंतर विभागाने एकूण ३२ परवाने तत्काळ सील करण्याचा आदेश काढला आहे. या सर्व आस्थापना विभागाकडून सील केलेल्या आहेत, असे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी सांगितले.
थोमकर म्हणाले, “नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापूर्वीही कारवाई केली होती. कल्याणीनगरच्या घटनेनंतर कोझी बारवर कारवाई केली. या बारवर दोन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल केला. गेल्या वर्षभरामध्ये पुणे विभागाने एकूण २९७ परवानाधारकांवर विविध कारणांसाठी गुन्हे नोंदविले आहेत. त्यात एक कोटी १२ लाखांचा दंड वसूल केला आहे. या शिवाय १७ हॉटेल मालकांवर परवाना निलंबनाची कारवाई केली आहे; तर दोन परवानाधारक हॉटेल कायमस्वरूपी बंद केले आहेत.” पुणे विभागाकडे मद्यसेवन परवाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असून exciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच मद्यविक्री नियमांच्या उल्लंघनाबाबत काही तक्रारी असल्यास १८००२३३९९९९ टोल फ्री क्रमांकावर किंवा ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर नागरिकांना नोंदविता येणार आहेत, असे विभागाने सांगितले.
विभागीय उपायुक्त धोमकर म्हणाले…
* चालू आर्थिक वर्षात ५४ परवानाधारकांवर गुन्हे; पाच लाख दंड वसूल
* एकूण ३२ परवानाधारकांचे हॉटेल सील
* अपुऱ्या मनुष्यबळातही विभागाकडून नियोजनबद्ध कारवाई
* अल्पवयीन मुलांना व रूफटॉपवर मद्यविक्री न करणे यावर तपासणी मोहीम सुरू