वृत्तसंस्था : आज आपण जो सांता क्लॉज पाहतो, तो शतकानुशतके चालत आलेल्या लोककथांमधून नाही, तर एका जागतिक ब्रँडच्या मार्केटिंग धोरणातून जन्माला आला आहे. बिझनेसच्या भाषेत सांगायचे तर, कोका-कोलाने केवळ आपली विक्री वाढवली नाही, तर एका जागतिक पात्राची ओळखच कायमची बदलून टाकली. आज आपण जो लाल कपड्यातील गोलमटोल सांता पाहतो, तो मूळचा तसा नव्हता. १९ व्या शतकातील लोककथांमध्ये सांता क्लॉज कधी बारीक साधूसारखा दिसायचा, तर कधी हिरव्या, निळ्या किंवा तपकिरी कपड्यातील एका बुटक्या व्यक्तीप्रमाणे भासायचा; त्याच्या कपड्यांचा कोणताही एक ठराविक रंग नव्हता.
१९३० च्या दशकात अमेरिका आर्थिक मंदीतून जात असताना कोका-कोला कंपनी एका मोठ्या अडचणीत होती. कोला हे केवळ उन्हाळ्यात तहान भागवणारे ‘समर ड्रिंक’ मानले जात असल्याने हिवाळ्यात त्याची विक्री प्रचंड घटली होती आणि थंडीच्या दिवसांत व्यवसाय टिकवणे कंपनीसाठी कठीण झाले होते. लोकांच्या मनातील “कोका-कोला फक्त उन्हाळ्यासाठी आहे” हा समज दूर करण्यासाठी कंपनीने ‘ख्रिसमस’चा आधार घेण्याचे ठरवले. हिवाळ्यातही लोकांनी कोला प्यावा, या हेतूने त्यांनी सांता क्लॉजला आपल्या ब्रँडचा चेहरा बनवण्याचा जागतिक स्तरावरील सर्वात मोठा मार्केटिंग मास्टरस्ट्रोक खेळला. १९३१ मध्ये कोका-कोलाने प्रसिद्ध चित्रकार हॅडन संडब्लोम यांच्यावर सांताचे नवीन चित्र रेखाटण्याची जबाबदारी सोपवली. कंपनीला असा सांता हवा होता जो कोणताही भीतीदायक बुटका नसेल, तर एक अत्यंत आनंदी, प्रेमळ आणि विश्वासार्ह व्यक्ती म्हणून लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या मनात घर करेल. सांता क्लॉजने परिधान केलेला लाल रंगाचा कोट आणि टोपी हा योगायोग नव्हता. हॅडन यांनी सांताच्या कपड्यांसाठी कोका-कोलाच्या ‘लोगो’चा अधिकृत ‘सिग्नेचर रेड’ रंग वापरला. सांताला पाहताच लोकांच्या मेंदूला नकळत कोका-कोलाची आठवण व्हावी, असा यामागील शुद्ध व्यावसायिक हेतू होता.

