पुणे : पुणे शहरातील रस्त्यांची अगदी चाळण झाली आहे. शहरात रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहेत. खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता या खड्ड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक नवी युक्ती काढली आहे. पुणे शहर परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येत आहेत. त्यामुळे आता खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी एक ॲप सुरू करण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली सुरू होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रारी दूर करण्यासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली तयार केली आहे.या सुधारित ॲपमुळे खड्ड्याबाबत तक्रार करतात क्षणात संबंधितांना तो खड्डा बांधकाम विभागाच्या रस्त्यातील आहे की नाही कळेल,जर तो असल्यास संबंधित कनिष्ठ अभियंताकडे तक्रार पाठवल्याचा मेसेज येईल तसेच त्यांच्याकडून पुढील तीन दिवसात तो फोटो पाठवून दूरस्त करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
खड्डा दुरुस्ती वेळेत न झाल्यास संबंधित कनिष्ठ अभियंत्याला कारवाई सामोरे जावे लागणार आहे. पुणे शहराच्या बाहेरील आणि जिल्ह्यात बांधकाम विभागाचे अनेक रस्ते आहेत. त्या रस्त्यावर खड्डे दिसल्यास त्यांच्या तक्रार करण्यासाठी हे ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे . खड्ड्यांच्या तक्रारीसाठी तयार केलेल्या या अॅपद्वारे खड्ड्याचा फोटो काढून तो अॅपवर अपलोड करता येईल. त्यानंतर तो मेसेज कनिष्ठ अभियंत्याकडे जाईल त्यानंतर संबंधित तक्रारदारास प्रत्युत्तर म्हणून तो रस्ता बांधकाम विभाग आहे की नाही याचं उत्तर मिळेल. रस्ता बांधकाम विभागात असल्यास तक्रार पुढील कारवाईसाठी पाठवली जाईल. कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता या तिन्ही अधिकाऱ्यांकडे एकाच वेळी तक्रार जाईल. त्या रस्त्यावर खड्डे बुजवण्याची कार्यवाही ही कनिष्ठ अभियंत्याने तीन दिवसात पुर्ण करणे अपेक्षित आहे. खड्डा न बुजवल्यास अभियंत्यावर कारवाई करण्यात येणार आहे.