मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीतर्फे २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंद विरोधात काही लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर सत्ताधाऱ्यांनी या बंदला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्याच्या बंदबद्दल माहिती दिली. उद्याचा बंद कडकडीत असणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. यादरम्यान रेल्वे सेवा आणि बस सेवा बंद ठेवायला हरकत नाही, असे विधान त्यांनी केले. बंदबद्दल माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी आहे. आपली मुलगी शाळेत सुरक्षित राहिल का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. आपली मुलगी कार्यालयात सुरक्षित आहे का? असा प्रश्न माता-भगिनींना पडला आहे. याला वाचा फोडण्यासाठी आम्ही बंद पुकारला आहे. आम्ही विकृतीविरोधात बंद पुकारलेला आहे. बंदचे यश – अपयश हे विकृती आणि संस्कृतीचे असणार आहे. आपल्या माता-भगिनींची सर्वांना चिंता आहे, हे सरकारला दाखवून दिले पाहीजे.