टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेनंतर 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 6 ते 15 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे. बीसीसीआय निवड समितीने 28 सप्टेंबरला टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कली. या भारतीय संघात पुणेकर ऋतुराज गायकवाड याला संधी न दिल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र 2 तासातच ऋतुराज गायकवाडला कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली.
ऋतुराज गायकवाड इराणी ट्रॉफी स्पर्धेत रेस्ट ऑफ इंडियाचं नेतृत्व करणार आहे. रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना हा लखनऊ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. तर इंडिया बांगलादेश यांच्यातील पहिला टी 20i सामना हा 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेर येथे होणार आहे. त्यामुळे ऋतुराजला पहिल्या सामन्यात संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट होतं. मात्र उर्वरित 2 सामन्यांसाठी संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र टी 20i मालिकेसाठी भारतीय संघाच्या घोषणेनंतर अवघ्या 2 तासांमध्येच ऋतुराजला कॅप्टन्सी मिळाली आहे.
ऋतुराजला रणजी ट्रॉफीसाठी महाराष्ट्रच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने जम्मू काश्मीर आणि मुंबई विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. ऋतुराजला या 2 सामन्यांसाठी कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे. बीसीसीआयने टी 20i मालिकेसाठी 28 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 37 मिनिटांनी संघ जाहीर केला. तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी संघ जाहीर केला. त्यामुळे ऋतुराजचं नशीब अवघ्या अवघ्या काही मिनिटांमध्ये फळफळलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
रणजी ट्रॉफी 2024-25 साठी महाराष्ट्र संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), निखील नाईक (उपकर्णधार आणि विकेटकीपर), अंकीत बावणे, सचिन धस, अर्शीन कुलकर्णी, मुर्तझा तृंकवाला, सिद्धेश वीर, मुकेश चौधरी, हितेश वालुंज, प्रदीप दढे, रजनीश गुरुबानी, रामकृष्ण घोष, हर्षल काटे, प्रशांत सोलंकी, सत्यजीत बच्छाव, मंदार भंडारी (विकेटीकपर) आणि अझीम काझी.
रणजी ट्रॉफी 2024-25 साठी जम्मू-काश्मीर टीम : पारस डोगरा (कॅप्टन), शुभम खजुरिया (उपकर्णधार), अहमद बंदे, अभिनव पुरी, विव्रान्त शर्मा, शुभम पुंडीर, अब्दुल समद, शिवांश शर्मा (विकेटकीपर), साहिल लोत्रा, आबिद मुश्ताक, उमरान मलिक, रोहित शर्मा, युद्धवीर सिंह, आकिब नबी आणि रसिख सलाम.