ठाणे : डोंबिवली ते घाटकोपर दरम्यान धावत्या लोकलमध्ये एका विवाहितेची छेड करून पीडितेशी लगट करून तिचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला डोंबविली लोहमार्ग पोलिसांनी १२ तासातच बेड्या ठोकल्या आहेत. हरिषकुमार सुदुला (वय २७, रा, विक्रोळी पूर्व) असे अटक नाराधमाचे नाव आहे. या संदर्भात लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता घाटकोपर परिसरात पती आणि मुलांसह राहते. तर नराधम सुदुला हा विक्रोळी पूर्व भागात असलेल्या टागोर नगरमध्ये राहतो. त्यातच पीडित विवाहिता ही घाटकोपरहून डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या नातेवाईकाला भेटण्यासाठी पती आणि मुलांसह आली होती. तर नराधमही डोंबिवलीमध्ये कामानिमित्त आला होता. २३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थनाकातून सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या पाच नंबर फलाटावरुन जलद लोकलने जनरल डब्यात घाटकोपरपर्यंत पीडित विवाहिता, पती आणि मुलांसह प्रवास करीत होती. त्याच वेळी नराधम सुदुला हाही डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या त्याच जनरल डब्यातून प्रवास करत असतानाच डोंबिवली स्थानकातच डब्यात चढताना त्याने पीडितेशी छेड काढली होती. त्यानंतर डोंबिवली ते घाटकोपर दरम्यान लोकलमधील गर्दीचा फायदा घेत, नराधमाने पीडितेशी लगट करून विनयभंग केला.
दरम्यान, घाटकोर रेल्वे स्थानकातही डब्यातून उतरताना तो छेड काढत पळून गेला. मात्र, या घटनेनंतर पीडिता भयभीत होऊन पतीला घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पीडित विवाहितेने २४ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडेलला प्रकार सांगताच पोलिसानी नराधमावर भादंवि कलम ३५४, ३५४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्याशी संपर्क साधला असता, गुन्हा दाखल होताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांनी आरोपी ओळख पटवली. त्यानंतर आरोपीला विक्रोळी भागातून डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी १२ तासाच्या आत ताब्यात घेत अटक केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास डोंबिवली लोहमार्ग पोलीस करत आहेत.