वसई : मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा १ च्या पथकाने पालघऱ जिल्ह्यातील अमली पदार्थाचा कारखाना उघडकीस आणला असून तब्बल ३७ कोटींचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले आहे. या प्रकरणी एकूण ७ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून पिस्तोल आणि काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
अमली पदार्थांची विक्री कऱणारे काही आरोपी भाईंदर मधील एका लॉज मध्ये असल्याची माहिती मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा १ च्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी भाईंदर येथील विन्यासा रेसिडन्सी येथे छापा मारून ४ जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून २५१ ग्रॅम एमडी, गावठी पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली होती. त्यानंतरच्या तपासात या अमली पदार्थाच्या कारखान्याचा उलगडा झाला. यातील एक आरोपी चंद्रशेखर पिंजार याने पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील त्याच्या शेतघरात (फार्म हाऊस) एमडी बनविण्याचा कारखाना तयार केल होता. तेथे पोलिसांनी छापा टाकून एमडी हे अमली पदार्थ, ते तयार करण्यासाठी लागणारी रसायने, उपकरणे जप्त करण्यात आली. या एकूण कारवाईत एकूण ३७ कोटींची एमडी (मॅफेड्रॉन) हे अमली पदार्थ, २ पिस्तुल, काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्याची तसेच अमली पदार्थांचा कारखाना उघडकीस आणण्याची ही पालघर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई असल्याचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांनी सांगितले. याप्रकरणात सध्या एकूण ७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये सनी सालेकर (२८), विशाल गोडसे (२८), दिपक दुबे (२६), शहबाज शेख (२९) तन्वीर चौधरी (३३), गौतम घोष (३८) समीर पिंजार (४५) आदींचा समावेश आहे. सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात यापूर्वी अमली पदार्थ, शस्त्र बाळगणे, चोरी, अपहरण, सरकारी कामात अडथळा आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
मोखाडा शहरापासून हे फार्म हाऊस पाच किलोमीटर अंतरावर असून मोखाडा येथील आई.टी.आय. विद्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. या फार्म हाऊस वर जाण्यासाठी पायी रस्ता तयार करण्यात आला असून याठिकाणी कोणतेही वाहन जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. साधारण एक हजार चौरस फूट जागेवर बांधकाम असून वर पत्र्याचे आच्छादन आहे. फार्म हाऊसच्या परिसरात कोणत्याही प्रकारची वस्ती नसल्यामुळे हे निर्जन ठिकाण अमली पदार्थांच्या कारखान्यासाठी निवडले होते.