ठाणे : मुंबई महानगरातील शहरांच्या तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाच्या झळांमुळे नागरिकांच्या अंगाची काहीली होऊ लागली असून त्यापाठोपाठ आता उष्मघाताच्या त्रासामुळे दिवसाला सुमारे शंभर पक्षीप्राणी जखमी होत असल्याचे समोर आले आहे. उष्मघाताच्या त्रासामुळे चक्कर येऊन खाली पडल्यामुळे पक्षांचे पंख आणि पायाला इजा होत आहे तर, जखमी झालेल्या प्राण्यांवर इतर प्राणी हल्ले करीत असल्याने त्यांची प्रकृती आणखी चिंताजनक होत असल्याचे समोर आले आहे. तसेच उपचारासाठी दाखल होणाऱ्या प्राण्यांच्या मृत्युचे प्रमाण वाढताना दिसून येत असून दिवसाला सरासरी १५ ते २० पक्षीप्राण्यांचा मृत्यु होत आहे. मुंबई तसेच आसपासच्या शहरात मार्च महिन्याच्या अखेरीपासून उन्हाचे चटके बसू लागले आहेत. एप्रिल महिन्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. नागरिकांच्या अंगाची काहीली होऊ लागली आहे. सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत उन्हाच्या झळा कायम असतात. तर, सायंकाळी आणि रात्री उष्ण वातावरण असते. यामुळे उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे उष्मघाताचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणांकडून नागरिकांना काही महत्वाच्या सुचना केल्या जात आहेत.