पुणे : अमली पदार्थ तस्करीत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून एका नायजेयिरन महिलेला अटक केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पुणे, कुरकुंभ ओैद्योगिक वसाहत, दिल्ली, सांगलीत छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी तीन हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. मेफेड्रोन तस्करी प्रकरणात नुकतीच शोएब सईद शेख (वय ३४, रा. कोंढवा) याला नुकतीच अटक करण्यात आली होती. शेखने मुंबईतील नायजेरियन महिलेला मेफेड्रोनची विक्री केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून नायजेरियन महिलेला अटक केली.
शेखने नायजेरियन महिलेला आतापर्यंत सात ते आठ वेळा मेफेड्रोनची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शेखच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी न्यायालायत हजर केले. न्यायालयाने शेखला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मेफेड्रोन तस्करी प्रकरणात मुख्य सूत्रधार संदीप धुनिया नेपाळमार्गे कुवेतला पसार झाल्याचे उघडकीस आले आहे.