बदलापूर – येथील आदर्श शाळेत झालेल्या दोन लहान मुलींच्या अत्याचाराचा सविस्तर आणि अधिक खोलात तपास करण्यासाठी राष्ट्रीय बालहक्क आज बदलापूर शहराला भेट देणार आहे. यावेळी आयोगाचे दिल्ली येथील वरिष्ठ महिला अधिकारी आणि त्यांचे सहकारी शाळा व्यवस्थापनातील संबंधित व्यक्ती आणि बदलापूर येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा महिला बालविकास विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत. तसेच अधिकाऱ्यांचे हे पथक शाळेला देखील भेट देणार आहे. यामुळे या अत्याचार तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरुद्ध केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच राज्य शासनाकडून देखील हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
मात्र या प्रकरणातील सर्व संबंधित पोलीस अधिकारी, संबंधित शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षक यांच्यावर केवळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यासर्व ढिम्म प्रक्रियेवर न्यायालयाने देखील ताशेरे ओढले आहेत. असे असतानाचा आता या प्रकरणाच्या तपासाला अधिक गती देण्यासाठी राष्ट्रीय बालहक्क आयोग आज बदलापूर शहराचा दौरा करणार आहे. यामध्ये दिल्ली येथील आयोगाचे वरिष्ठ महिला अधिकारी आणि त्यांचे सहकारी अधिकारी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये शाळा व्यवस्थापनातील सर्व संबंधित व्यक्ती, पोलीस अधिकारी आणि जिल्हा महिला बालविकास विभागाचे अधिकारी यांच्या समवेत बैठक पार पडणार आहे. यावेळी तक्रार दाखल करून घेण्यास झालेली दिरंगाई, शाळा व्यवस्थापनाने पालकांना केलेलं असहकार्य यांसह विविध गोष्टींचा यावेळी बालहक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सखोल तपास अपेक्षित आहे. तसेच बालहक्क आयोग यानंतर राज्य शासनातील संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.