मुंबई : राज्याच्या राजकारणात बुधवारचा दिवस सर्वात महत्त्वाचा आणि नाट्यमय ठरला आहे. राज्याच्या सत्तानाट्याचा निवाडा बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलाय. शिवेसना आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. भरत गोगावलेंचा व्हीप योग्य असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. राजकीय पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मान्यता मिळाली आहे. सुनावणीवेळी ठाकरे गटाचे सुनिल प्रभू, अंबादस दानवे, वैभव नाईक, सुनिल शिंदे तर शिंदे गटाचे राहूल शेवाळे, मंगेश कुडाळकर,भरत गोगावले,बालाजी किणीकर,संजय शिरसाठ उपस्थित होते.
शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे सुरुवातीला 16 आमदारासोबत गुवाहाटीला गेले होते. या मोठ्या घडामोडीने राज्याच्या राजकारणात भूकंप आला आणि महावीकास आघाडीसरकार कोसळलं. यानंतर उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरवण्यात यावे या साठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तर, शिंदे गटानेही उद्धव ठाकरे गटातील 14 आमदार अपात्र ठरवण्यात यावे या साठी कोर्टात धाव घेतली. यावर तब्बल दीड वर्ष सूनवणी झाली. दोन्ही गटांकडून शिवसेनेची घटना मागवून घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या घटनेवर तारीख नव्हती, म्हणून त्यांनी दिलेली घटना वैध नाही. १९९९ साली निवडणूक आयोगात दाखल केलेली घटना वैध आहे. २०१८ साली घटनेत केलेले बदल निवडणूक आयोगाला न कळवल्याने ते बदल देखील वैध नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या घटनेची प्रत ही शिवसेनेची खरी घटना आम्ही ग्राह्य धरली आहे. पर्यायाने ठाकरेंनी दिलेली घटना वैध नसल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं.
खरी शिवसेना कुणाची ठरविण्यासाठी हे निकश लावण्यात आले..
कोणता गट हा खरा पक्ष आहे, हे ठरवण्यासाठी २०१८ ची घटना ही मोजपट्टी मानता येणार नाही. त्यामुळेच विधीमंडळातील बहुमताचा विचार करून कोणता गट हा खरी शिवसेना आहे, याचा निर्णय घेत आहे. बहुमत हे एकनाथ शिंदे गटाकडे आहे आणि त्यामुळे त्यांना मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता देत आहे. खरी शिवसेना कुणाची हे ठरवताना शिवसेना पक्षाची घटना, निवडणूक आयोगाचा निकाल आणि पक्षातील बहुमत हे महत्त्वाचं आहे, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचनाच्या सुरूवातीलाच स्पष्ट केलं. तसेच गेल्या तीन महिन्यात दोन्ही गटाच्या वतीने झालेल्या युक्तिवादाची माहितीही नार्वेकर यांनी दिली.
पक्षप्रमुख नाही तर राष्ट्रीय कार्यकारणी सर्वोच्च..
शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणी ही सर्वोच्च आहे. फक्त पक्षप्रमुख निर्णय घेऊ शकत नाही, असं सांगताना पक्षप्रमुखच अंतिम निर्णय घेऊ शकतात, हा ठाकरे गटाचा दावा राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावला.
एकनाथ शिंदेना गटनेतेपदावरून काढण्याचा ठाकरेंना अधिकार नाही..
एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून केलेली हकालपट्टी नियमाला धरून नव्हती. पक्षप्रमुखाला वाटलं म्हणून एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून बाजूला केलं, हे नियमाला धरून नाही. आधी राष्ट्रीय कार्यकारिणीत चर्चा होणे गरजेचे होते. जर पक्षप्रमुखालाच सगळे अधिकार होते असं मानलं तर पक्षातील कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकत नाही. लोकशाहीत पक्षप्रमुखाच असे अधिकार दिले तर लोकशाहीसाठी ते घातक असेल, असं नार्वेकर म्हणाले.