डोंबिवली : शहरात गृहसेविकांकडून घरात चोरी करण्याचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाप्रकारे घरात गृहसेविका चोरी करू लागल्या तर विश्वास ठेवायचा कोणावर आणि कामे करून घ्यायची कोणाकडून, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. येथील एका महिला डॉक्टरच्या घरातून एका गृहसेविकेने सहा लाखाहून अधिक किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे. मागील दहा वर्षाच्या कालावधीत गोळवली येथील रिजन्सी इस्टेटमधील डेझी इमारतीत डॉ. अश्विनी आशिष सावंत यांच्या घरात हा प्रकार घडला आहे. या चोरीप्रकरणी डॉ. अश्विनी सावंत यांनी आपल्या घरात काम करणारी दिनदयाळ क्रॉस रस्त्यावरील महात्मा फुले नगर झोपडपट्टीतील उषा वाटोळे या गृहसेविकावर संशय व्यक्त करून तिच्यावर विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे.
डॉ. सावंत यांच्या घरात काम करत असताना गृहसेविका उषा यांनी डॉ. सावंत यांची नजर चुकवून त्यांच्या घरातील सहा लाख २३ हजार रूपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. घरात चोरी झाली नसताना ऐवज चोरीला गेला असल्याने सावंत यांनी आपल्या गृहसेविकेवर संशय व्यक्त करून तिच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मानपाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गेल्या वर्षभरात डोंबिवली परिसरात सात ते आठ घटनांमध्ये गृहसेविकांनीच घरातून सोन्याचा ऐवज चोरून नेल्याचे प्रकार उघडकीला आले आहेत.