ठाणे : बँकेतील मुदत ठेवीविषयी फोनवरून चौकशी करणे डोंबिवलीतील एका ज्येष्ठ व्यक्तीस चांगलेच महागात पडले. सायबर चोरांनी या व्यक्तीची सहा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली असून फसवणुकीचा हा प्रकार नुकताच समोर आला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ज्येष्ठ व्यक्तीचे वय ६० असून ते डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरात राहतात. मुदत ठेवीसंदर्भात त्यांनी बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन केला. मात्र, फोन कोणी उचलला नाही. त्यामुळे या ज्येष्ठाने ऑनलाइनच्या माध्यमातून बँकेचा ग्राहक क्रमांक प्राप्त करत या नंबरवर फोन केला. माझी बँकेतील ठेवीची मुदत संपली असून पैसे कमी मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर ज्येष्ठाला एक लिंक आली. या लिंकमध्ये नाव, मोबाइल क्रमांकासह अन्य माहिती भरण्य़ास सांगण्य़ात आले. मात्र, या लिंकवर बँकेचा सर्व्हर डाऊन झाल्याने तुम्ही एक ॲप डाऊनलोड करा, अशी माहिती ज्येष्ठाला देण्यात आली.
या माहितीनंतर ज्येष्ठाने संबधित ॲप डाऊनलोड केले. तसेच, समोरून सांगितल्याप्रमाणे आणखी काही सोपस्कर पार पाडल्यानंतर आरोपींनी ज्येष्ठास नेट बँकिंगवर क्लिक करण्यास सांगून तुमची राहिलेली रक्कम जमा झाली का? अशी विचारणा केली. या सर्व प्रक्रियेला वेळ का लागत आहे याविषयी ज्येष्ठाने विचारणा केल्यानंतर बँकेचा सर्व्हर डाऊन असल्याचे आरोपींनी सांगितले. मात्र, काही वेळानंतर ज्येष्ठाच्या बँक खात्यामधून प्रत्येकी दोन लाखांचे दोन, एक लाखांचा एक आणि ९९ हजारांचा एक असे एकूण ५ लाख ९९ हजारांचे चार व्यवहार झाले. या व्यवहाराबाबत ज्येष्ठाने संबधित व्यक्तीला फोन केल्यानंतर या व्यक्तीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. ज्येष्ठाच्या तक्रारीनंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला.