नवी मुंबई : खारघर सेक्टर-३५ मध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका नायजेरियन नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अब्दुल रझाक हसन (३४) असे या नागरीकाचे नाव असून त्याच्याजवळ ५ लाख ५० हजारांचे एमडी सापडले आहे. खारघर सेक्टर-३५ मधील सावन रेसिडेन्सी समोरील रोडवर एक नायजेरियन अमली पदार्थांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने खारघर सेक्टर-३५ भागात सापळा लावला होता. यावेळी अब्दुल रझाक हसन (३४) हा नायजेरियन नागरीक संशयास्पदरित्या आल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.
त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ प्लास्टिक पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचे एमडी (मेफेड्रॉन) हे अमली पदार्थ आढळुन आले. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने अब्दुल रझाक हसन याच्या जवळ सापडलेले पदार्थ जप्त केले. तसेच त्याच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कलमाखाली अटक केली.