ठाणे : खासदार होताच नरेश मस्के इन ॲक्शन मोडवर आले आहेत. दिवसभर विजयाच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. स्थानकात ठिकठिकाणी पडेल्या राडारोडावरुन त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच फलाट क्रमांक ५ च्या रुंदीकरणाची पाहणी केली. खासदार नरेश म्हस्के यांनी फलाट क्रमांक १, २ आणि ५ ची पाहणी केली. तेव्हा त्यांना फलाटावर ठिकठिकाणी राडारोडा पडलेला दिसला. पावसाळ्याचे दिवस असून येत्या दोन दिवसात पडलेले रॅबिट तातडीने उचलण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या. रेल्वे प्रवाशांशी दौऱ्या दरम्यान नरेश म्हस्के संवाद साधला. प्रवासी प्रतिक्षालयाला भेट देत तातडीने गंजलेली बाकडी बदलण्याच्या सूचना केल्या.
फलाटांवरील पाणपोई, शौचालयांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याबरोबरच पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना नरेश म्हस्के यांनी केली. फलाटांवर येत असलेल्या दुर्गंधीवर तातडीने उपाययोजना करण्याचे स्टेशन मास्तरांना निर्देश म्हस्के यांनी दिले. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत आहेत. मोठमोठ्या सुविधा आम्ही देऊ पण प्राथमिक सुविधाही देणे तितकेच गरजेचे आहे. रेल्वे स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यावर आमचा भर असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.