कल्याण : कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांना समाज माध्यमातून आठ गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी बुधवारी देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणाने खळबळ उडाली असून महेश यांनी याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून धमकी देणाऱ्या दीपक कदम नावाच्या इसमाचा शोध सुरू केला आहे. दीपक कदम या इसमाने समाज माध्यमातून धमकी देताना म्हटले आहे की, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी तुला चार गोळ्या घातल्या होत्या. मी आठ गोळ्या घालीन. ज्या राजकीय लोकांच्या जीवावर उड्या मारत आहेस, त्यांचे आता राजकारणातील स्थान काय आहे ते समजून जा. तुला आता शंभर टक्के ठार मारणार एवढे लक्षात घे’. गेल्या पाच महिन्यापूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात स्वताच्या रिव्हाॅल्व्हरमधून गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये महेश यांचे समर्थकही गंभीर जखमी झाले होते. कल्याण पूर्वचा आमदार होण्यासाठी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे महेश गायकवाड यांना चढ देत आहेत. यामुळे ते आपल्या प्रत्येक कामात अडथळा आणून आपणास त्रास देत आहेत, असा समज आमदार गायकवाड यांनी केला होता.
या त्रासाप्रकरणी आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या तक्रारींची कोणीही दखल घेत नव्हते. आता आपणास न्याय मिळणेही कठीण आहे. आणि महेश यांचा गणपत गायकवाड यांच्या विकास कामे, खासगी कामांमध्ये हस्तक्षेप वाढू लागला होता. या सततच्या जाचाने आमदार गणपत गायकवाड त्रस्त होते. अशाच एका जमिनीच्या प्रकरणात समझोता करण्यासाठी हिललाईन पोलीस ठाण्यात फेब्रुवारीमध्ये एकत्र जमले असताना आमदार गायकवाड यांनी रागाच्या भरात महेश यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गोळ्या घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात महेश सुदैवाने बचावले. आता आमदार गायकवाड या गुन्ह्याप्रकरणी तळोजा कारागृहात आहेत. महेश यांच्यावर एका विकासकाने दोन महिन्यापूर्वी खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आमदार गायकवाड यांनी तीन महिन्यापूर्वी आपल्यावर गोळीबार केला होता. त्या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत. त्या गु्न्ह्यातील आरोपींचे नाव घेऊन आपणास धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करावी यासाठी आपला पाठपुरावा आहे. या प्रकरणात काही राजकीय दबाव येत आहे. धमकी प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रर केली आहे, असे महेश यांंनी सांगितले. महेश गायकवाड यांची तक्रार प्राप्त झाली आहे. गु्न्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, असे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले.