पनवेल : पावसाळ्यात पनवेलमध्ये किटकजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी साथरोग- किटकजन्य आजार टाळण्याकरिता काळजी घेण्याचे आवाहन पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. पालिकेमार्फत पावसाळ्यात नागरिकांनी घ्यायाच्या खबरदारी विषयी जनजागृती विविध माध्यमांतून करण्यात येत असून नागरिकांनी पालिकेने दिलेल्या सूचनांचे पाळल्यास आजारांवर वेळीच प्रतिबंध करता येईल असे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. पनवेलमध्ये सध्या तापाची साथ आहे. तीन ते चार दिवस ताप रुग्णांना येत असल्याने खासगी दवाखान्यांमध्ये गर्दी आहे. पनवेल महापालिकेच्या दवाखान्यात तापावर उपचार घेण्यासाठी रुग्ण जात आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने हा व्हायरल ताप असून घाबरुन न जाता रुग्णांनी ताप आल्यास नजीकच्या पालिकेच्या दवाखान्यात जाण्याचे आवाहन केले आहे. पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. गोसावी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पालिकेने स्वच्छता निरिक्षक, आरटी कामगार, एनपीडब्ल्यू यांच्या मार्फत घरोघरी भेट देऊन ताप व साथरोगाचे रुग्ण आहेत का याची माहिती घेऊन त्याद्वारे पालिकेचे आरोग्य विभागात रुग्ण शोधून त्यांच्यापर्यंत उपचार देत असल्याची माहिती दिली.
पालिका कोणत्या परिसरात कोणते कीटक जास्त आढळतात याचे सुद्धा सर्वेक्षण करत आहे. या सर्वेक्षणातून कोणत्या परिसरात डेंग्यू व मलेरियाचा फैलाव करणारे डास आढळतात त्याची माहिती पालिकेकडे जमा होईल. पालिकेने यासाठी संशोधकांची नेमणूक केली होती. या संशोधकांनी दिलेल्या अहवालानूसार पनवेल महापालिका क्षेत्रात मलेरीयाचा फैलाव करणाऱ्या डासांची संख्या अधिक असल्याचे या संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आले. पालिका डासांच्या उत्पत्तीसाठी परिसरात धूरफवारणी व इतर प्रतिबंधित उपाययोजना केल्याचा दावा पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. गोसावी यांनी केला आहे. नागरिकांनी सुदृढ राहण्यासाठी काय करावे इमारतीतील पाण्याची टाकी निर्जंतुक करावी, पाणी उखळून व गाळून प्या, पालेभाज्या, फळे धुवूनच खावीत, कचरा घंटागाडीतच टाकावा, परिसर स्वच्छ ठेवावा, डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी साचलेले व डबक्यांमधील पाण्याचा निचरा होण्यासाठी सोय करावी, शिळे व उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत, जेवणापूर्वी व शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, पुर्ण शिजवेले, ताजे अन्न खावे, फुलदाणी मनीप्लँट,वॉटरकूलर इत्यादीमधील पाणी आठवड्यातून एक वेळा पुर्णपणे काढून कोरडे करून कोरडा दिवस पाळावा. ज्या ठिकाणी स्वच्छता पाळली जात नाही अशा हॉटेल इतर ठिकाणी, खाणे, पाणी पिणे टाळावे, बाहेरील बर्फ खाणे टाळावे. ताप सर्दी, खोकला अशा प्रकारची लक्षणे असल्यास नजिकच्या पालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील (पालिका दवाखाना) डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.