मुंबई : मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांसाठी पर्वणी आणि चिमुकल्याचं आकर्षण असलेली वनराणी, टॉय ट्रेन पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. गुजरातून काही महिन्यांपूर्वी आलेली ही नवीन ट्रेन देखील बंद झाल्यामुळे पर्यटकांमध्ये प्रशासना विरोधात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.
गुजरात अहमदाबाद मधून ही हिरव्या रंगाची नवीन ट्रेन मागवण्यात आली होती, नवीन ट्रेन बंद पडल्यामुळे ट्रेन बनवणाऱ्या कंपनीचा कामावर देखील प्रश्न चिन्ह निर्माण केली जात आहे. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वनराणी’ मिनी टॉय ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देण्यात आलंय. इंजिनमध्ये समस्या निर्माण झाल्याने सेवा तीन दिवसांपासून तात्पुरती बंद करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये बिघाड झाल्याने वनराणीची सफर करण्यासाठी उत्साही असलेल्या आणि दूरदूरहून आलेल्या पर्यटकांना परत जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, लवकरच वनराणी ट्रेनची सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती उद्यान प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी मे २०२१ मध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे वनराणी सेवा बंद झाली होती. त्यानंतर, ६ जानेवारी २०२६ पासून पुन्हा पर्यटकांसाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली. १४ मार्च रोजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करुन पर्यटकांसाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली होती.

