ठाणे : ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीशी संबंधित अडचणींमुळे शिक्षण खंडित होण्याचे गंभीर वास्तव लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलींसाठी ‘पिंक रूम’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या उपक्रमासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पाच शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या खोल्या उभारल्या जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी दिली.
किशोरवयात मुलींमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांची प्रक्रिया सुरू होते. या संवेदनशील काळात स्वच्छता, गोपनीयता आणि आत्मसन्मान जपण्यासाठी सुरक्षित जागेची गरज असते. मात्र ग्रामीण भागात या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने अनेक मुलींना मासिक पाळीदरम्यान शाळा टाळावी लागते, तर काही वेळा त्यांचे शिक्षण कायमचे थांबते. युनिसेफच्या सर्वेक्षणानुसार देशभरात दरवर्षी सुमारे २३ लाख मुली मासिक पाळीशी संबंधित अडचणींमुळे शाळा सोडतात, तर तब्बल ७१ टक्के मुलींना पहिली पाळी येईपर्यंत त्याविषयी कोणतीही माहिती नसते. सामाजिक गैरसमज, स्वच्छतेबाबत अज्ञान, सुविधा अभाव आणि आर्थिक मर्यादा या समस्यांना अधिक तीव्र करतात. या पार्श्वभूमीवर ‘पिंक रूम’ हा उपक्रम केवळ सुविधा नसून शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हस्तक्षेप मानला जात आहे. मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन बदलणे, विश्रांती घेणे आणि स्वतःची स्वच्छता राखणे यासाठी मुलींना शाळेतच सुरक्षित व स्वतंत्र जागा उपलब्ध होणार आहे. साधारणपणे १५ बाय २० फूट आकाराची वर्गखोली ‘पिंक रूम’ म्हणून विकसित केली जाणार असून, प्रत्येक शाळेसाठी सुमारे ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.या उपक्रमामुळे मुलींची शाळेतील उपस्थिती वाढण्यास आणि शिक्षणात सातत्य राखण्यास मदत होणार आहे.

