डोंबिवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलणे कुणालाही शक्य नसून विरोधकांकडून संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवत समाजाची दिशाभूल केली जात असल्याचे म्हणत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ज्या काँग्रेसने संविधान बदलून देशात आणीबाणी लावली, तीच काँग्रेस आज संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवते, हे दुर्दैवी आणि दुटप्पीपणाचे असल्याची टीकाही खासदार शिंदे यांनी केली. कल्याणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिदे बोलत होते. कल्याणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बुद्धभूमी फाउंडेशनने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी विरोधकांवर हा हल्ला चढवला. याप्रसंगी बोलताना कल्याण पूर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी गेल्या १२ वर्षांपासून होत होती. पण माझ्याकडे ही मागणी आल्यानंतर त्याचा लगेचच पाठपुरावा सुरू केला आणि जागेचे आरक्षण बदलून तिथे फक्त पुतळाच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या स्मारकात ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, त्यांनी केलेला संघर्ष, डिजिटल पुस्तके, इतकेच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवाज देखील ऐकता येणार आहे. त्यामुळे हे फक्त स्मारक नव्हे, तर ज्ञानकेंद्र असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंद यांनी सांगितले.
आज विरोधकांकडे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मुद्देच नसून त्यामुळे देशाचे संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवत समाजाची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. मात्र याच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांचा निवडणुकीत पराभव केला होता, हे आज विसरून चालणार नाही, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने संविधान दिन साजरा करणे सुरू केले, संविधान यात्रा सुरू केली, इतकेच नव्हे, तर नवीन संसद भवनालाही संविधान भवन असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्य सरकारकडून इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जात असून लंडनमधील बाबासाहेबांच्या राहत्या घरातील स्मारकही आपले सरकार उभारत असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले, त्यामुळे दिशाभूल करणाऱ्यांच्या आणि माथी भडकावणाऱ्यांच्या बाजूने नव्हे, तर आपल्या माणसाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी समस्त समाजाला केले. कल्याणमध्ये बुद्धभूमी फाउंडेशनकडून तथागत भगवान गौतम बुद्धांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू असून भविष्यात त्यांच्या काही प्रलंबित विषयांसाठीही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.