कल्याण : कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, डोंबिवली, अंबरनाथ रेल्वे स्थानकांतील प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अंबरनाथमधून अटक केली. या चोरट्यांकडून १७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. बदलापूर ते डोंबिवली रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना वाढ झाली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे.
कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी विशेष तपास पथके तयार करून या चोरट्यांचा शोध सुरू केला होता. यासाठी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासण्यात येत होते. त्याआधारे पोलिस चोरट्यांचा माग काढत होते. असे असतानाच दोन दिवसापूर्वी कल्याण रेल्वे स्थानकात एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेला. त्याची तक्रार दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक दुसाने यांनी मोबाईल चोरीला गेलेल्या भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. मिळालेल्या माहितीवरून आरोपी अंबरनाथ भागातील रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले.
पोलिसांनी दोन दिवस अंबरनाथ भागातील झोपडपट्ट्या, चाळी भागात तपास केला. त्यावेळी त्यांना अशोक गायकवाड, नरेश गायकवाड यांची माहिती मिळाली. हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोघांना शिताफीने अटक केली. या दोघांनी बदलापूर ते डोंबिवली परिसरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचे मोबाईल चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. या चोरट्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस घेत आहेत.