मुंबई : देशामध्ये लाखो जोडपी वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त आहेत. मात्र महागड्या आयव्हीएफ उपचार पद्धतीमुळे अनेक जोडप्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते. मात्र आता केईएम रुग्णालयामध्ये सोमवारपासून सुरू होणाऱ्या आयव्हीएफ केंद्रामुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील जोडप्यांना दिलासा मिळणार आहे. केईएम रुग्णालयामध्ये सुरू होणाऱ्या आयव्हीएफ केंद्रामध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये उपचार उपलब्ध करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये आधुनिक भ्रूणतज्ज्ञ प्रयोगशाळा सुविधा, डिजिटल वैद्यकीय नोंद प्रणाली आणि अत्याधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
बदलती जीवनशैली व ताणतणावामुळे जोडप्यांमध्ये काही वर्षांपासून वंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. वंधत्वावरील उपचार महागडे असल्याने, तसेच शासकीय रुग्णालयामध्ये हे उपचार उपलब्ध नसल्याने अनेक जोडप्यांना आपल्या पालक होण्याच्या इच्छेला मुरड घालावी लागते. याच पार्श्वभूमीवर केईएम रुग्णालयामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या अद्ययावत व अत्याधुनिक आयव्हीएफ केंद्राचे सोमवारी अनावरण करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये रुग्णांना उच्च दर्जाचे आयव्हीएफ उपचार उपलब्ध करण्याबरोबरच, भावी स्त्रीरोगतज्ज्ञांना प्रशिक्षण, आयव्हीएफ उपचार सुलभ आणि परवडणारे करण्याबाबत संशोधन करणे, मध्यम आणि निम्न उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी परवडणारी सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही पालकत्वाचा आनंद घेता येणार आहे. तसेच प्रगत वंध्यत्व उपचार केवळ खासगी कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या श्रीमंत जोडप्यांपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्यांना उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. केईएम रुग्णालयाचे माजी विद्यार्थी डॉ. अनिरुद्ध मालपानी आणि डॉ. अंजली मालपानी यांनी या आयव्हीएफ केंद्रासाठी पुढाकार घेऊन सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प साकारला. या केंद्रात आधुनिक भ्रूणतज्ज्ञ प्रयोगशाळा सुविधा, डिजिटल वैद्यकीय नोंद प्रणाली आणि अत्याधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे या केंद्रामध्ये राज्यातील स्त्रीरोगतज्ज्ञांना आयव्हीएफ योग्य पद्धतीने करण्याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच येथे संशोधनावरही भर देता येणार आहे. ही सुविधा इतर शासकीय रुग्णालयांसाठीही आदर्श ठरेल. केईएम रुग्णालय हे त्रिस्तरीय आरोग्य सेवा पुरविणारे मुंबईतील महत्त्वाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. केईएम रुग्णालयामध्ये सुसज्ज आयव्हीएफ केंद्र सुरू झाल्यानंतर वंधत्वाने त्रस्त असलेल्या रुग्णांना अधिक चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल, अशी माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली.

