नवी दिल्ली : दिब्रूगढ ते नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या 20503 राजधानी एक्सप्रेसमध्ये (Rajdhani Express) दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या भारतीय सैन्यातील एका जवानाला जीआरपीने अटक केली आहे. या सैनिकाच्या बॅगमध्ये दारुच्या चार बाटल्या सापडल्या आहेत. समस्तीपूर जंक्शनवर ही कारवाई करण्यात आली. यावेळी सैन्याच्या जवानाने जीआरपीच्या जवानासोबत मारामारी करण्याचा प्रयत्न केला.
अटक करण्यात आलेल्या या जवानाचं नाव देवेंद्र दत्त असं आहे. देवेंद्र सध्या दिमापूरमध्ये आसाम रायफल्समध्ये कार्यरत आहे. तो राजधानी एक्सप्रेसच्या बी -9 या एसी कोचमधून प्रवास करत होता. कटिहारपासून त्याने दारुच्या नशेत गोंधळ घालायला सुरुवात केली. तो सैन्याच्या जवानांसोबत विचित्र वागत होता. ट्रेनमध्येच तो दारु पित होता आणि गोंधळ घालत होता. त्यामुळे ट्रेनमधले प्रवासी हैराण झाले. ट्रेनमधल्या इतर प्रवाशांनी याविषयीची माहिती टीटी आणि आरपीएफला दिली. टीटीने जवानाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने टीटीचे अजिबात ऐकले नाही.
टीटीने (TT) समस्तीपूरच्या कंट्रोल रुमला घडलेल्या सगळ्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आरपीएफ (RPF) – जीआरपीची (GRP) टीम समस्तीपूर स्टेशनवर पोहोचली. राजधानी एक्सप्रेस स्टेशनवर पोहोचल्यावर जीआरपीने जवानाला ताब्यात घेतलं. या जवानाच्या सामानाची झडती घेण्यात आली. बॅगेची झडती घेतल्यानंतर त्यात दारुच्या चार बाटल्या सापडल्या. जवानाने यावेळी आरपीएफ – जीआरपी टीमला त्रास देण्याचा प्रयत्न केला. जीआरपीच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारु पिऊन ट्रेनमध्ये गोंधळ घालणाऱ्या या जवानाला पोलिसांनी अटक करुन जेलमध्ये ठेवलं आहे.
या जवानाला आता काय शिक्षा दिली जाणार हे पाहावं लागेल. पण भारतीय सैन्याचा जवान असा बेजबाबदारपणे वागल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या जवानाच्या वर्तनामुळे इतर प्रवाशांनाही त्रास झाला. भारतीय सैन्यातील जवानांना अनेक जण आदर्श मानतात. सैन्यातील जवानांचा भारतातील सगळे नागरिक नेहमी आदर करत असतात. पण या जवानाच्या वर्तनामुळे लोकांना खूप त्रास झाला. जीआरपीकडून या ट्रेनमधील संपूर्ण घटनेचा अधिक तपास सुरु आहे.