नाशिक प्रतिनिधी : मृताच्या टाळूवरील लोणी खाणे म्हणजे काय याचा प्रत्यय बुधवारी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटलमधील एका महिलेच्या मृतदेहावरील सोन्याची पोत तोडून त्यामधील काही मणी आणि वाट्या चोरीस गेल्याने संवेदनाही मृत झाल्याचे दर्शन घडले. हातसफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याच्या कारनाम्याची हॉस्पिटलमध्ये दिवसभर चर्चा होती.
गौळाणे परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह बुधवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. यामध्ये एका दाम्पत्यासह त्यांच्या लहान मुलीचाही समावेश होता. मुलीला विष देऊन त्यानंतर दाम्पत्याने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. हे मृतदेह सर्वप्रथम कुंभमेळा बिल्डिंगच्या कॅज्युल्टीमध्ये ठेवण्यात आले. ते शवविच्छेदनासाठी पाठविण्यापूर्वी त्यांच्या अंगावरील दागिने संबंधित नातेवाइकांकडे सुपूर्द करा, अशी सूचना तेथील कंत्राटी सुपरवायझर महिलेने उपस्थित कर्मचाऱ्याला केली. कर्मचाऱ्याने मृत महिलेची मान वर उचलली तेव्हा गळ्यातील पोत तुटलेली दिसली. त्याने ही बाब सुपरवायझर महिलेसह मृत महिलेच्या नातलगांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, आम्ही मृतदेह आणला तेव्हा पोत तुटलेली नव्हती, असा दावा नातलगाने केला. मृतदेह कोणी आत घेतला होता, याबाबत चौकशी झाल्यानंतर सुधीर राठोड या सफाई कर्मचाऱ्याचे नाव पुढे आले. उपस्थित पोलिसांनी त्याला जवळ बोलावले. त्याची अंगझडती घेतली असता खिशात सोन्याचे मणी आणि मंगळसूत्राच्या वाट्या मिळून आल्या. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
संबंधित कर्मचाऱ्याबाबत याआधीही अनेक तक्रारी झाल्या आहेत. सुधीर राठोड हा वर्ग चार कर्मचारी असून, तो अनेकदा गैरहजर असतो अशी तक्रार आमच्याकडे करण्यात आल्याची माहिती मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील यांनी दिली. संबंधित प्रकार चर्चेचा विषय ठरल्यानंतर परिचारिकांनी पुन्हा या कर्मचाऱ्याबाबत तक्रारी करीत त्याच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याची बदली केली जाणार असल्याची चर्चा बुधवारी हॉस्पिटलच्या वर्तुळात होती.