पनवेल : परदेशामध्ये लाखो रुपयांची नोकरी लावण्याची जाहीरात करुन कळंबोली वसाहतीमध्ये कार्यालय थाटले, बेरोजगार उमेदवारांकडून लाखो रुपये जमवले आणि भामटा रातोरात पळून गेल्याने कळंबोली परिसरातील तरुणांमध्ये एकच खळबळ माजली आहे. अनेक तरुणांनी फसवणूक झाल्याबाबत तक्रार पोलीसांत दिली. या प्रकरणी अजून संशयीत आरोपी पोलीसांच्या हाती सापडलेला नाही. या प्रकरणातील पहिली तक्रार पिडीत उमेदवाराने नऊ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची दिली आहे. पुढील काही दिवस फसगत झालेल्या तरुणांना एकत्र करुन त्यांच्या प्रत्येकाची तक्रार दाखल करण्याची कार्यवाही पोलीस ठाण्यात सूरु आहे. परदेशात लाखो रुपयांचा पगात असल्याची नोकरी लावतो, मुलाखतीमध्ये फक्त उत्तीर्ण व्हा, असा बहाणा करुन शेकडो तरुणांना नोकरीचे आमिष दाखविले. मात्र वर्ष उलटले तरी नोकरी लागत नसल्याने संबंधित कंपनीच्या कार्यालयाच्या खेट्या मारल्यानंतर संशयीत भामटा पळाला. अखेर वैतागलेल्या तरुणांनी थेट पोलीस ठाणे गाठले. यामुळे शेकडो तरुण आणि त्यांचे कुटूंबिय हवालदिल झाले आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. एका तक्रारीनंतर अनेक उमेदवारांनी पोलीसांकडे संपर्क साधला.
कॅनडा, पोर्तुगाल व इतर देशांमध्ये क्लार्क व इतर पदांवर नोकरी लावून तेथेच राहण्याची कंपनीच्यावतीने सोय करु असे आश्वासन कळंबोली येथील एका भामट्याने तरुणांना दिले होते. कळंबोली येथील ३९ वर्षीय बलजीत सिंग या तरुणाची अशीच फसगत या भामट्याने केली आहे. कॅनडा येथे बलजीत सींग यांना नोकरी मिळेल या आशेने सींग यांनी वसाहतीमधील सेक्टर ११ येथील वास्तुशांती या इमारतीमधील ग्लोबल इंटरनॅशनल एज्युकेशन सेंटर ॲण्ड जुन्यीअर एज्युकेशन सर्व्हीसेस या कंपनीतील व्यक्तीला धनादेशाने नऊ लाख रुपये नोकरी लावण्यासाठी दिले. मागील वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात घेतलेली रकमेनंतर नोकरी लागली नाही. तसेच दिलेली रक्कम परत मागीतल्यानंतर ती परत मिळाली नाही. त्यामुळे सींग यांनी पोलीस ठाणे गाठले. सिंग यांच्यासह असंख्य तरुणांनी पोलीस ठाण्याकडे दाद मागीतली. काही तरुण पंजाब येथूनही याच कार्यालयाने फसवणूक केल्याचे सांगत आहेत. मंगेश यादव या रिक्षाचालकाने पोर्तुगालमध्ये एक लाख रुपये महिन्याला पगार मिळेल या अपेक्षेने संबंधित कार्यालयात पन्नास हजार रुपये जमा केले होते. यादव यांना जमा केलेल्या रकमेची संबंधित कार्यालयाच्यावतीने पावती दिली होती. मात्र वर्ष उजाडले तरी नोकरी काही लागली नाही. कळंबोली पोलीसांनी या घटनेनंतर फसवणूक झालेल्या तरुणांना पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.